अभ्यास

शेतकऱ्याचे आत्मवृत निबंध – Shetkaryache atmavrutta in Marathi

Shetkaryache Manogat Marathi Nibandh

शेतकऱ्याचे आत्मवृत / मनोगत मराठी निबंध – ‘नमस्कार मित्र हो ! माझे नाव मदन बाबूराव जाधव, राहणार आवळेगाव, जि. सिंधुदूर्ग. मी एक कोकणातला शेतकरी. निसर्गाने बहरलेल्या कोकणात माझा जन्म झालेला म्हणून मी आपणाला भाग्यवान समजत होतो. पण जसजसा मोठा होऊ लागलो तसा मला या लहरी निसर्गाचा अनुभव येऊ लागला. डोंगरदयांनी व्यापलेल्या या कोकणातला शेतकरी हा मुळातच अतिशय गरीब त्यामुळे माझे बालपण गरीबीतच गेले. पेज पिऊन व उकड्या तांदळाचा भात खाऊन माझे बालपण पुढे चालले होते. गाव डोंगराच्या कुशीत वसल्यामुळे शहरांशी गावाचा तसा संबंधच नव्हता. त्यामुळे गावात एक मास्तरी शाळा ती पण इयत्ता चौथीपर्यंत. पुढे शिकायचे तर तालुक्याला जावे लागणार या दडपणानेच शाळा चौथीतच संपली. मग काय दिवसभर गुरं राखायचो, आणि भटकायचे नदीत मस्त डुंबायचे. पण अचानक साप चावल्याने बाबा वारले अन् एका दिवसात मी जबाबदार झालो ! साऱ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. घरात धाकटी चार भांवडे आई व आजी.

शेतकरी असल्याने अन्य पर्यायच नव्हता. त्यामुळे पावसाच्या आधी जमिनीची मशागत आणि पुढे पावसाची वाट पाहायची हा दरवर्षीचा कार्यक्रम. कधी पाऊस आपल्या लहरी स्वभावाचे दर्शन घडवायचा. कधी दडी मारुन बसायचा. मग पेरलेले बियाणे सुकून गेले तरी त्याला पत्ता नसायचा. कधी धो – धो पावसाने सारे बियाणेच वाहून जायचे. हे असेच चालायचे. निसर्गावर अवलंबून असलेल्या या शेतीने सारे जीवनच परावलंबी झालेले. त्यातच ग्रामपंचायतीने ‘आंब्याच्या बागा लावा व बागायतदार व्हा’ अशी नवी योजना पुढे आणली. पदरी असलेले चार पैसे या उपक्रमात लावले पण त्यातही नुकसानच झाले. कारण या उपक्रमात पैसा मिळतो, पण आधी तो ओतावा लागतो तो माझ्याजवळ नसल्याने आंब्याची रोपे करपून गेली. डोक्यावर कर्ज झाले. रोपांना घालायला पाणी हवे ते पाणी कोकणात कुठले? पावसाचे पाणी अडवायला हवे, धरणे बांधायला हवीत पण आमचा एकही नेता सरकारात नसल्याने आम्ही नेहमी दुर्लक्षितच राहिलो. भूगोलात शिकलो कोकणात पाऊस फार पण उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मारामार. त्यातच लग्न झाले. प्रपंचाची जबाबदारी वाढली.

कोकणात रेल्वे आली. आता हळूहळू गावे सुधारत आहेत. नवीन नवीन उदयोगधंदे कोकणात येत आहेत. धाकटी भावंडे या कारखान्यात कामावर जातात. हातात चार पैसे खेळतात. आता मुलांना शिकविण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे वाटतय. विकासाची गंगा दारापर्यंत आली आहे. फक्त भय वाटते ते एका गोष्टीचे विकास होता होता उदया हा विकास आम्हां मूळ भूमिपुत्रांनाच गिळणार नाही ना? नाहीतर कोकणाचा विकास व्हायचा पण त्या विकासानंतर त्या कोकणात मूळचा कोकणचा राजा हा शेतकरीच त्यात नसायचा. विकासाने नवनवीन क्षेत्र खुली झाली आहेत, शेतकयांना बँकाकडून कर्ज मिळू लागले पण कर्जच आज शेतकऱ्यांच्या गळयाला फास लावू लागलेत. देशावर, विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी या कर्जापोटी आत्महत्या केल्यात हे सारे आठवलं की राग येतो सरकारचा. आत्महत्या केल्यावर त्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होते. मग तो जिवंत असताना त्या शेतकऱ्याला सन्मानाने जगता येईल अशा योजना सरकार का आखत नाही? एका बाजूला भारत हा शेतीप्रधान देश आहे. असे नारे दयायचे व दुसऱ्या बाजूला आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर श्रद्धांजली वाहायची ही कसली पद्धत ?

मित्रहो! माझे तुम्हाला एकच आवाहन आहे शेतकरी हा समाजाचा देशाचा एक प्रमुख घटक आहे. त्याला दुर्लक्षुन चालणार नाही. तर त्याला सन्मानाने कसे जगता येईल याकडे सर्व समाजाने व सरकारने लक्ष दिले पाहिजे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button