तोंड येणे लक्षण आणि घरगुती उपाय – रात्री दवाखाना बंद होतेवेळी एक तरुण पेशंट माझ्या दवाखान्यात आला. चेहऱ्यावरून अगदी वैतागलेला दिसत होता. मी त्याला बसायला सांगितले आणि काय त्रास होतो? हे ऐकण्यासाठी खुर्चीत बसले, पण तो काही बोलायला तयार नाही. फक्त हावभाव! मग
हळूच त्याने बोटांनी आपले ओठ थोडेसे उघडून मला तोंड बघण्यास सांगितले. अरे बापरे! मी तर हादरलेच. संपूर्ण तोंड लालभडक झालं होतं. असं वाटत होतं, चुकून जरी स्पर्श झाला तरी भळाभळा रक्त वाहायला लागेल. मी त्याला लगेच घेण्यासाठी एक पुडी आणि आठवड्याचे औषध देऊन पाठविले.
आठवड्याने परत तो पेशंट आला तेव्हा, त्याला पुष्कळसा आराम मिळाला होता. तो सांगू लागला, की वरेचवर तोंड येण्याने अगदी हैराण झालो आहे. बरीच औषधे घेऊन झाली; पण तेवढ्यापुरताच त्रास कमी होतो. परत पंधरा दिवसांनी त्रास सुरू होतो. हळूहळू केस उलगडत गेली आणि मानसिक ताण-तणाव हे मुख्य कारण लक्षात आलं. पूर्वी परीक्षेच्या काळातच त्याला हा त्रास व्हायचा; पण औषधाने लगेच बरा व्हायचा. अलीकडे मात्र प्रमाण खूपच वाढलं होतं. शिक्षण पूर्ण होऊन नोकरीसाठी धावपळ सुरू झाली आणि अर्थातच मानसिक ताणही वाढला. त्याअनुषंगाने मी औषधोपचार सुरू केले आणि त्याचा त्रास बरा झाला. तोंड येणे (स्टोमॅटायटिस) ही अगदी किरकोळ तक्रार, पण बऱ्याच लोकांमध्ये ती आढळून येते. तोंड येणे म्हणजे तोंडाच्या आतील आवरणास सूज येणे याची
सविस्तर कारणे पुढीलप्रमाणे-
तोंड येणे लक्षण
१) तोंडाची नीट स्वच्छता न राखणे, तंबाखूचे किंवा दारूचे अतिसेवन, अतिशय तिखट व मसालेदार पदार्थ, तसेच शक्तीशाली अँन्टिबॉयॉटिक्समुळे तोंडामधील आवरणांस सूज येऊ शकते.
२) अशक्तपणा आणि संसर्गजन्य रोगामुळेही तोंडामधील आवरणास सूज येऊन व्रण तयार होतात.
ही झाली तोंडाशी संबंधित किंवा शरीरातील इतर बिघाडामुळे निर्माण झालेली कारणे. याशिवाय काही जीवाणू, विषाणू किंवा बुरशीचा प्रादुर्भावसुद्धा (फंगस) तोंड येण्यास कारणीभूत उरतो.
१) जीवाणू (बॅक्टेरिया) : यामध्ये तोंडात व्रण निर्माण होऊन त्यावर करड्या, भुऱ्या रंगाचे आवरण तयार होते. या वेळी तोंडामधील लाळेचे प्रमाण वाढते. तोंडाचा घाण वास येतो. हिरड्यातून रक्त येते. काही रुग्णांमध्ये तर गळ्याभोवतीच्या गाठींना (लिम्फ नोड)
सूज येऊन ताप येतो. यांमध्ये सिगारेट ओढण्याची सवय, पूर्वीपासूनची हिरड्यांची सूज आणि मानसिक ताण-तणाव या गोष्टी जंतूसंसर्ग पटकन होण्यास कारणीभूत ठरतात.
२) व्हायरल : अ) वारफोड्यांस कारणीभूत लणारा व्हायरस तोंडामध्येसुद्धा पुरळ निर्माण करतो. अर्थातच यांचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आढळून येते. तोंडामध्ये जखमा होतात. याचबरोबर ताप, थकवा, मानेमधील गाठींना सूज येणे ही लक्षणे आढळतात.
सर्वप्रथम तोंडमध्ये गोलाकार, भुया रंगाचे पुरळ येतात. हे पुरळ काही तासानंतर फुटतात आणि तोंडामध्ये व्रण तयार होतात. ही सर्व लक्षणे सात ते अठरा दिवसांपर्यंत दिसून येतात. ब) कांजिण्या : या वेळी संपूर्ण अंगावर तर पुरळ येतातच; पण तोंडामध्येसुद्धा पुरळ येऊन जखमा होतात.
३) बुरशी (फंगस) : बुरशीमुळे तोंड येण्याचे प्रमाण लहान मुले, हेरॉईनचे व्यसन असलेले लोक, वयस्कर मंडळी तसेच दीर्घकाळ अँन्टिबायोटिक किंवा स्टेरॉईडचे सेवन केल्याने अशक्तपणा आलेले लोक यांच्यामध्ये बहुतेक करून आढळून येते. तोंडात पांढरे
चट्टे तयार होतात व त्यातून रक्त येते. हे चट्टे घसा किंवा अगदी अन्न-नलिकेपर्यंत सुद्धा पसरू शकतात. कॅनडिडा (CANDIDA) या बुरशीमुळे तोंड येणे, हे एड्सचे प्रमुख लक्षण मानले जाते. दाताची कवळी बसविल्यामुळे काही लोकांमध्ये वरचेवर तोंड येण्याची तक्रार दिसून येते. हिरड्यांना सूज व तोंडामध्ये पुरळ ही लक्षणे एकत्रित दिसून येतात. कवळी बनविताना जी रसायने वापरली
जातात, त्याची अॅलर्जी म्हणून तोंडामध्ये पुरळ येऊ शकतात.
तोंड आल्यावर घरगुती उपाय
1. एक ग्लास कोमट गरम पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला, हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा. हा
उपाय दिवसातून दोन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते.
2. तुळसीच्या चार ते पाच पाने चावून त्याचा रस प्या.
3. खाण्याच्या पानाचा पूर्ण रस काढून त्यात साजूक तूप टाकून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा (त्याला चोळू नका).
4. खाण्याच्या पानाचे चूर्ण तयार करुन त्यात थोडा मध मिसळा (घोटून). हे चाटण लावल्याने फोड लवकर बरे होतात.
5. लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.
6. सुक्या खोबऱ्याचे तुकडे भरपूर वेळ चावून खा.
7. भरपूर पाणी प्या. यामुळे पोट साफ होऊन तोंडाला आराम मिळेल.
पण, बऱ्याच लोकांमध्ये वरचेवर तोंड येण्यामागची नेमकी कारणे कोणती, हे कळत नाही. अशा वेळी एकतृतीयांश लोकांमध्ये आनुवांशिकता हे प्रमुख कारण आढळून आले आहे.
रक्तक्षय (ऍनेमिया), मानसिक ताण-तणाव, एखादया अन्नघटकाची ऍलर्जी किंवा तोंडामध्ये दुखापत झाल्यास तोंडाच्या आतील बाजूस पुरळ येऊन जखमा होतात.
काही स्त्रियांमध्ये तोंड येणे ही समस्या पाळीशी संबंधित असल्याचे आढळून येते; म्हणजे पाळीच्या आधी किंवा पाळीच्या दिवसांमध्येच तोंडामध्ये पुरळ येतात. लहान मुलांमध्ये तापाबरोबर तोंडात पुरळ येण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.
प्रामुख्याने निकोटिनिक ऍसिड आणि रायबोफ्लेविन (ही जीवनसत्व ‘बी’च्या शृंखलेतील जीवनसत्वं आहेत) या जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यास तोंड येते.
मिथोट्रिक्सेट किंवा तत्सम औषधांच्या सेवनाने तोंडामध्ये पुरळ येतात. याशिवाय ल्युकेमिया (ब्लड कॅन्सर), न्यूट्रोपेनिया (पांढऱ्या पेशींच्या संख्येत घट होणे) या आजारांमध्ये तोंड येणे ही तक्रार दिसून येते.
वरचेवर तोंड येणे या समस्येचे निदान करतेवेळी वरील उल्लेखिलेल्या सर्व बाबींचा विचार करावा लागतो व त्यानुसार औषध-योजना करावी लागते.
होमिओपॅथीमध्ये अर्सेनिक अल्बम, मर्क सॉल्ट, नक्स व्होमिका, लस टॉक्स, सल्फर इ. औषधे यांसाठी हमखास गुणकारी ठरतात.
-डॉ. वरदा जाधव, पुणे
Mala warshatun 1 wela tari tond yetech , tyawar ha upay nakki karun baghen