अपंग तरुणाचे आत्मवृत्त मराठी निबंध – अपंग तरुणाचे मनोगत (2024)
Autobiography of a Disabled Boy in Marathi
अपंग तरुणाचे आत्मवृत्त मराठी निबंध – अपंग तरुणाचे मनोगत – खूप सुंदर लिहलेला एक मराठी निबंध
“अशक्य नाही जगती काही,
असेल जर मनी ठाम निर्धार,
स्वप्ने सारी साकार होती,
अपयशात जर नाही मानली हार”
मी एक अपंग. जन्मत:च निसर्गाने अन्याय केलेला. जन्माला येतानाच पाय नसलेला. लुळा-पांगळा. त्यावेळी फक्त माझी आई एकटीच अशी होती जिने मला बयाशी धरले. भरल्या डोळ्यांनी अन् तुटल्या द्वयानं ती म्हणाली, ‘बाळा, तू तर देवाची देणगी ! जशी मला मिळाली, तशीच मी जीवापाड जपणार.’ आणि तिथून सुरु झाली आईची झुंज “मला पायावर उभा करण्याची.’ दिवस जाऊ लागले तसा मी रांगू लागलो. आणि रांगतच राहिलो. कारण खेळण्या-बागडण्यासाठी हवे असलेले पाय मला देवाने दिलेच नव्हते.
हळूहळू मला कळायला लागले की, मी इतर मुलांसारखा नाहीये. इतर मुले खेळायची तेव्हा मी नुसत्याच टाळ्या वाजवायचो. इतर मुले धावायची-बागडायची तेव्हा मी नुसताच हातावर उड्या मारायचो. त्यांच्यासारखं मला खेळता-बागडता येत नाही याचं मला फार वाईट वाटायचं. कधी-कधी आईच्या कुशीत शिरुन रडायचो. देवाला दोष दयायचो, त्याने मला असे अपंग बनविले म्हणून. पण आई मला थोपटायची अन् म्हणायची “वाईट नको वाटून घेऊस बाळा ! देवाने मनात काहीतरी ठरवूनच तुला असं बनविले असेल. तो उगाच कोणत्या गोष्टी करत नाही.” आई धीर दयायची. आई सावरायची. आई माझ्यासाठी सर्वकाही करायची. मीही सतत आईभोवती असायचो. आई हेच माझे नेहमी संपूर्ण जग होते.
एके दिवशी सकाळी आईने मला उठविले. अतिशय प्रेमाने ती मला म्हणाली “बाळ, ऊठ ! आज तुला शाळेत जायचं आहे.” मी आणि शाळा? मला आश्चर्य वाटलं. पण आई मला खरंच शाळेत घेऊन गेली. आईचा निर्धार होता मला खूप-खूप शिकविण्याचा. पण माझ्या मनात मात्र भीती होती. शाळेत इतर मुले मला मारायची. काही मुले मात्र खूप सांभाळून घेत. जसजसे दिवस जात होते, शाळा मला आवडत होती. मी इतर मुलांपेक्षा अभ्यासात हुशार होतो. गुरुजींनी शिकवलेले मी लगेचच आत्मसात करायचो. गुरुजींची शाबासकी घ्यायचो. हुरुप वाटायचा. या शाळेच्या काळात पहिला नंबर कधीच सोडला नाही. त्यात माझा आवाज अतिशय गोड होता. त्यामुळे आपोआपच संपूर्ण शाळेत मी सर्वांचा आवडता बनलो. शाळा घरापासून जवळ होती. सुरवातीला आई शाळेत सोडायला व घेऊन जायला यायची. पण जसजसा मी मोठा होऊ लागलो. माझाही निर्धार जागू लागला. मी रांगत-रांगत व इतर मित्रांच्या सहाय्याने शाळेत येऊ-जाऊ लागलो.
पण गावातील ही शाळा सातवीपर्यंतच होती. पुढील शाळा शहरात होती. शिकायची इच्छा होती. पण मार्ग दिसत नव्हता. पण म्हणतात ना ‘इच्छा तिथे मार्ग’ तसेच काहीसे झाले. गुरुजींना एका ‘अपंग पुर्नवसन’ संस्थेविषयी समजले. पण अडचण होती ती म्हणजे मला घरापासून खूप लांब जावे लागणार होते. आईचे मन पाठवायला तयार नव्हते. पण मी व गुरुजींनी आईला समजावले. शेवटी तीही तयार झाली. मी माझ्या नवीन शाळेत हजर झालो. अपंगांच्या वसतिगृहात राहून मी माझी शाळा पुढे चालू केली. या सगळ्या काळात अनेक कठीण प्रसंग आले. पण ठाम निर्धाराने त्या सर्वांवर मात केली. अत्यंत कठोर परिश्रमांनी बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या परीक्षेत कॉलेजमधून पहिला आलो. लगेचच एका बँकेत नोकरीला लागलो. नोकरी करता करता एम्. बी. ए. पूर्ण केले. यशाचा आलेख सतत चढता ठेवला. आज एका परदेशी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी करतोय. आईचे स्वप्न साकार केले. आज मी अभिमानाने म्हणू शकतो की, मी माझ्या पायावर उभा आहे.
माझ्या पायावर उभा झालो. पण मला दिसत होते इतरजण जे माझ्यासारखे अपंग होते. ८ असहाय्य होते. म्हणून मी आई व गुरुजींच्या सल्ल्याने स्वतःची ‘अपंग पुनर्वसन संस्था’ सुरू केली. आज मी अभिमानाने सांगू शकतो की, “मी कित्येक अपंगांना आपल्या पायावर उभे राहण्यास मदत करत आहे.
समाप्त !
संपूर्ण जगा मध्ये अपंग दिन हा दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला आहे. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.
मस्त आहे निबंध !