शेतकरी जीवन व समस्या निबंध – Shetkari Jivan Marathi Nibandh
Farmer Life Essay in Marathi
‘शेतकरी’ हा शब्द जरी कानावर पडला तरी आपल्या अंगाला काटे आल्यासारखे वाटते कारण आपण दररोज टी.व्ही. चॅनेल्सवर , वर्तमानपत्रात आणि सोशल मीडिया वर बघत असतो की, किमान दररोज एक तरी शेतकरी आत्महत्या करतो. आपण ग्रामीण भागातील आहोत म्हणून आपले आणि शेतकऱ्याचे नाते खूप जवळचे आहे आणि माझा जन्म देखील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झालेला आहे.
माझ्या मते, “शेतकरी” या शब्दाची फोड केली तर त्याचा अर्थ असा होईल शेत + करी म्हणजेच जो शेतात रात्रंदिवस काबाड कष्ट करतो म्हणजे सतत काम करत असतो. आणि आपल्या साठी दोन वेळेचं अन्न पिकवतो तो शेतकरी.. माझा शेतकरी राजा खूप काबाड-कष्ट करत असला तरी त्याला सुख मिळत नाही. त्याच्या वाटेला नेहमी दुःखाचे डोंगर उभे राहतात. तरी देखील तो इतरांबद्दल वाईट विचार करत नाही. पण आपण जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा विचार केला तर ते आपल्याला विरुद्ध पाहावयास मिळेल. पैसा ज्याच्याकडे असतो तो पैशांचा गैरवापर करतो परंतु शेतकरी एवढा काबाडकष्ट करतो तरी देखील तो पै-पै जमवून ठेवतो. थोडक्यात शेतकऱ्याचे चित्र डोळ्यासमोर आणा, आपल्याला त्याचा काळा खुट्ट चेहरा, त्याचे मळलेले कपडे, त्याचे डोक्याचे वाढलेले केसं, त्याचा फाटलेला बनियान, गळ्यात मळलेला रुमाल असं व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर लगेच उभं राहील.
शेतकऱ्यांची मुलभूत समस्या “पाणी” आहे, कारण जर शेतात पाणी असेल तर उत्पन्न जास्त निघेल परंतु जर पाणी नाही राहिले तर शेतकऱ्याला दुष्काळाला सामोरे जावे लागते. त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार येत असतो. आपण म्हणत असतो की पाणी हेच जीवन, तर विचार करा आपल्याला पाणी जीवन देऊ शकते. तरी सुद्धा आपण पाण्याचा अपव्यय करतो, अतिरेकी वापर करतो आणि बिचारा माझा शेतकरी थेंब-थेंब पाण्यासाठी उन्हां-तान्हांत वणवण भटकत असतो. तरी देखील त्याच्या वाटेला अपयशचं आलेल असतं.
आज २१ व्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वाढले आहे. परंतु अशिक्षित असल्यामुळे त्याच्याविषयी शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना नसते. जर एखाद्या वेळेस चांगल पीक आलं तर, मग त्याला मार्केटला भाव नसतो. कर्ज काढून शेती करणारा शेतकरी जेव्हा पीक बाजारात नेतो तेव्हा मात्र भाव नसल्यामुळं त्याला अनेक अडचणींना तोंड दयावं लागतं. अशा अडचणीत जर मुलीचं लग्न हे शेतीच्या पीकांवर अवलंबून असेल तर मग शेतकऱ्याला मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढावे लागते. परिणामी शेतकरी हा कर्जबाजारी होतो. कारण २१ व्या शतकामध्ये देखील ‘हुंडा प्रथा’ मोठ्या प्रमाणात समाजामध्ये चालू आहे. हुंड्याच्या या प्रथेमुळे अनेक शेतकऱ्यांना किंवा मुलीच्या बापाला बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम काढावी लागते.
आज समाजामध्ये हुंड्यासाठी देखील अनेक मुलींवर अन्याय-अत्याचार केले जातात. हुंड्यासाठी त्यांचा छळ केला जातो. त्यामुळे समाजामध्ये अनेक मुलींची आत्महत्या होताना आज आपल्या निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांची अशी बिकट परिस्थिती बघून आजच्या काळात अनेक मुली देखील आत्महत्या करतात. म्हणून शेतकरी जरी उभ्या जगाचा पोशिंदा असला तरी त्याच्या जीवनात अनेक अडचणी येत असतात. शेतकरी तरी संपूर्ण जगाला पीक देत असला तरी, एक वेळ अशी येते की त्याच्या घरात अन्नाचा एक कणही उरत नाही. हालअपेष्ठा करून देखील आज शेतकऱ्यांचे जीवन समाधानकारक नाही. कारण अशिक्षित असल्यामुळे त्यांना अनेक अडवणींना तोंड द्यावे लागते .
आज जर आपण सुखाने जीवन जगत आहोत ते फक्त माझ्या शेतकऱ्यामुळे कारण माझा शेतकरी पाणी वाचवतो, झाडे लावतो, अन्न पिकवतो, पर्यावरण संरक्षणाला मदत करतो आणि आपण ह्या सर्व गोष्टींचा समतोल बिघडवण्याच काम करतो. मी शेवटी सर्वांना एकच सांगेन की, “माझा शेतकरी सुखाने जगला तरचं आपण सुखाने जणू.”
– प्रा. हर्षदिप दिवाणसिंग सोलंकी.