आरोग्य

लसूण खाण्याचे फायदे आणि माहिती

Benefits of Eating Garlic in Marathi

लसूण खाण्याचे फायदे आणि माहिती – घरात सहज उपलब्ध होणारी आणि स्वयंपाकात नेहमी वापरली जाणारी लसूण आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

लसूण ही भारतात सर्वत्र मिळणारी वनस्पती असून, औषधी वनस्पती म्हणून व खाद्यपदार्थ म्हणून अत्यंत उपयोगी आहे. याचे प्रामुख्याने दोन प्रकार असून, एक छोटा असतो व दुसरा मोठा असतो. मोठ्या लसणीस महारसोन म्हणतात. तिचे कांदे मोठ्या आकाराचे असतात. त्या व्यतिरिक्त एक लहान कळीची लसूण असते. औषधीमध्ये तिचा वापर अधिक प्रमाणात करतात.

लसूण खाण्याचे फायदे

लसणीमध्ये उडनशिल तेल असून, त्यात गंधकाचा अंश असतो. सहा चवीच्या रसापैकी आंबट सोडून अन्य पाच रस असलेली ही वनस्पती आहे. प्रामुख्याने तिखट चवीची असते. लसणाच्या झाडाच्या विविध अंगांमध्ये विविध रस (चवी) असतात. कंद तिखट चवीचा, पाने कडू, नाळ तुरट, नाळेचे टोक खारट आणि बी गोड असते.

लसूण उष्ण गुणधर्म असलेली वनौषधी आहे. नित्य आहारातील भाजी-आमटी वा चटणीमध्ये लसून मोठ्या प्रमाणात वापरतात.

लहान मुलांना सर्दी- खोकला असल्यास लसणीची माळ गळ्यात बांधतात.

आमवातामध्ये सांध्यावर सूज असल्यास लसूण वाटून त्याचा लेप लावतात. त्यामुळे वेदना व सूज कमी होते.

गजकर्णासारख्या कंड्रयुक्त त्वचा विकारात लसणीचा रस त्वचेवर चोळतात. त्यामुळे खाज कमीहोऊन विकार नाहीसे होतात.

कोळ्यासारखे कीटक चावल्यावर लसणीचा लेप लावल्यास विषारी परिणाम नाहीसे होतात.

३ ग्रॅम लसूण मध्ये खालील गुणधर्म मिळतात

लसूण खाण्याचे फायदे

कान दुखत असल्यास तेलात लसूण उकळवून ते तेल कोमट झाल्यावर कानात टाकतात. त्याने कान दुखण्याचे कमी होते.

अर्धांगवात (पक्षाघात), गृध्राली (सायटिका), आमवात इत्यादी अनेक विकारांत लसूण हे प्रभावी औषध आहे.

दृष्टीमांद्य असल्यास लसणीचा रस पोटात देतात. भूक न लागणे (अग्निमांद्य), अजीर्ण, तोंडाला चव नसणे, पोटदुखी, कृमी, मूळव्याध या वातकफजन्य विकारांत अत्यंत उपयुक्त आहे.

अन्न खाल्ल्यावर होणाऱ्या पोटफुगीमध्ये लसूण पाकळ्यांनी सिद्ध केलेला भात खाल्ल्यास तो सहज पचतो. पोटफुगी होत नाही.

हृदयास उत्तेजन देऊन सूज कमी करण्याचे कार्य लसणीमुळे होते.

स्निग्ध व तीक्ष्ण गुणामुळे लसूण कफनिस्सारणाचे कार्य करते, तिच्या उग्र गंधामुळे कफाची दुर्गंधी नाहीशी होते.

लसणीच्या पाकळ्या दुधात उकळवून दिल्यासजुनाट खोकला, दमा, क्षय, स्वरभेद या विकारांत उत्तम उपयोग होतो.

IHD म्हणजे अवरोधजन्य हर्रोगामध्येसुद्धा लसूण टाकून दूध सिद्ध करून दिल्याने फायदा होतो. अनेक प्रकारच्या हृद्रोगामध्ये उदावर्त म्हणजे वायूचा त्रास असतो. लसूण टाकून दूध दिल्यामुळे वायूचे निःसरण होते व सूज कमी होते.

छातीवर व पोटावर लसणीचे तेल चोळल्यानेसुद्धा वेदना कमी होतात.

लसूण वृष्य असल्याने शुक्रजननाचे कार्य करते. कामोत्तेजना वाढविण्यासाठी लसणीचा उपयोग होतो.

स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी अंगावर साफ जात नसल्यास लसणीचा उपयोग होतो.

अस्थिभंगामध्ये हाडे जुळवून आणण्यासाठी लसूणसिद्ध दूध अत्यंत उपयुक्त आहे.

ज्यामध्ये त्वचा कुजण्याची वा सडण्याची क्रिया होते, अशा त्वचाविकारात लसूण उपयुक्त ठरते. लसूण व मिरे वाटून त्याचा लेप केल्याने जखमेमध्ये पडलेले किडे मरून जातात.

लसूण वाटून हळद व गूळ एकत्र करून मुका मार बसलेल्या जागी लेप लावावा. म्हणजे सूज लवकर उतरून वेदना कमी होते.

लसूण वाटून हुंगायला दिल्याने मुर्छा आली असल्यास ती जाते.

सर्प किंवा विंचू चावल्यास लसूण वाटून लावल्यास वेदना कमी होतात. लसणीच्या पाकळ्या बारीक वाटून कानशिलावर बांधल्याने अर्धशिशी त्वरित कमी होते.

लसणीचे तेल छातीवर चोळल्याने सर्दी, ढास(खोकला) त्वरित कमी होतो. डांग्या खोकल्यावर लसूण हे प्रभावी औषध आहे. रक्तदाब किंवा ब्लड प्रेशरवर लसूण दुधात सिद्ध करून प्यायल्याने चांगला फायदा होतो. रक्तातील कोलेस्टेरॉल वाढल्यास लसूण हे उपयुक्त औषध आहे.

शरीरातील अनावश्यक मेद वाढल्यास लसणीसारखे औषध नाही.

लसूण त्वचा, फुप्फूस व मूत्रपिंड या अवयवांतून बाहेर पडते व त्या वेळी तीनही अवयवांना उत्तेजीत करतो.

लसूण उष्ण व तीक्ष्ण असल्याने पित्त प्रकृतिच्या व्यक्तींना व गर्भार महिलांना, तसेच रक्तपितीसारखे विकार असलेल्यांना देऊ नये. लसणाच्या पाकळ्या गाईच्या तुपात तळून रोज भोजनापूर्वी खाल्ल्याने आमवात बरा होतो.

लसूण घालून केलेले उडदाचे वडे तिळाच्या तेलात तळून खाल्ल्याने पोट फुगणे, तोंड वाकडे होणे, पक्षाघात (अर्धांगवात) इत्यादी विकार बरे होतात.

अशा या बहुगुणी लसणीचा आहारात योग्य प्रकारे समावेश करणे आवश्यक आहे.

अजून वाचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button