वृक्षाचे मनोगत मराठी निबंध – अरे महेश, इकडे बघ. मी इथं आहे. चालून चालून तू दमला आहेस. आराम करण्यासाठी तू एखादे झाड दिसते का, हे शोधतो आहेस ना? या ओसाड माळरानावर मी एकटाच उरलो आहे. आज मी तुला माझी गोष्ट सांगतो. ऐकशील का रे?
एकेकाळी या माळरानावर असंख्य डेरेदार वृक्ष होते. माझे वय शंभर वर्षापेक्षा अधिक आहे. शेजारच्या गावातील एका शेतकऱ्याने माझे रोपटे लावले. तोच माझा जन्म. माझी काळजी घेतली. मला खत-पाणी घातले. ऊन, वायापासून माझे रक्षण केले. हळूहळू मी जोमाने वाढू लागलो. काही वर्षातच माझे एका सुंदर हिरव्यागार अशा वृक्षात रूपांतर झाले. मला माझ्याच रुपाचा हेवा वाटू लागला. विविध प्रकारचे पक्षी माझ्या अंगाखांदयावर खेळू लागले, बसू लागले. माझी गोड फळे चाखू लागले. आनंदाने गाऊ लागले. काहींनी तर घरटीही बांधली. शेतात काम करुन थकलेले शेतकरी विसाव्यासाठी माझ्याच सावलीत बसू लागले. ऊन-पावसापासून रक्षण करण्यासाठी वाटसरू, गाई-वासरू माझ्या आसऱ्याला येऊ लागले हे असे अनेक वर्षे चालू होते.
पण अचानक सारे बदलले आजूबाजूच्या गावातील वस्ती वाढू लागली. घरे बांधण्यासाठी, फर्निचरसाठी, इंधनासाठी माणसे वृक्षतोड करु लागली. स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हांला ओरबाडू लागली. एकेकाळी हिरवागार दिसणारा हा परिसर उजाड माळरान बनला. मानवाची ही स्वार्थी वृत्ती बघून मला खूप दुःख होते. अतिशय निरपेक्ष मनाने आम्ही तुम्हाला सर्वस्व देतो. पण त्या मोबदल्यात मानवाकडून आम्हाला आज अशी वागणूक मिळते. विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड होत आहे. जमिनीची धूप होत आहे. प्रदूषण वाढते आहे.
हल्ली सर्वत्र ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवरचे तापमान वाढत आहे. बर्फ वितळू लागला आहे. वन्य जीवन संकटात येऊ लागले आहे. हे सर्व कशामुळे तर तुम्हा मानवाने आमच्यावर निर्दयपणे चालविलेल्या कुहाडीमुळे माझे ही हातपाय या कुहाडीने असेच तोडले गेले. हे जर असेच चालू राहिले तर बाबा रे, तुम्हा माणसांना याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील. दुष्काळ पडेल, नदयांना पूर येतील. जीवसृष्टी नाहीशी होईल. मानव एवढा बुद्धीमान असून असा कसा वागतो? हेच मला एक कोडे पडले आहे. तेव्हा जागे व्हा, तुम्ही सगळ्यांनो, ही वृक्षतोड थांबवा. प्रत्येकाने ‘मी माझ्या आयुष्यात एक तरी झाड लावेन व ते जगवेन’ असा निर्धार करा. तरच तुमच्या पुढच्या पिढीचे जगणे सुसह्य होईल. तुझ्याशी बोलताना मला आज सुंदरलाल बहुगुणांची आठवण येते. वृक्षतोड होऊ नये म्हणून त्याने आपले सर्वस्व पणाला लावले. ‘चिपको’ आंदोलन सुरु केले. आज या देशाला अशा शेकडो सुंदरलाल बहुगुणांची गरज आहे.
पण आता मी थकलो आहे, जीर्ण झालो आहे. माझं पान न पान गळून गेले आहे. तरीही ऊन-पावसात मी ताठ उभा आहे. आयुष्याशी झगडत, आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी ! आज तू आलास, मी माझी व माझ्या योगाने साऱ्या निसर्गाची कहाणी तुला ऐकवली. माझं दुःख तुझ्याजवळ बोलल्याने मला खूप शांत वाटत आहे.
माझं फक्त एकच मागणं आहे तुझ्याकडे की, ‘तुम्ही जगा व आम्हांलाही जगवा’.
Best nibhand
best निबंध
झाड़ अगदी बरोबर बोलले हे झाडाचे आत्मकथन खुप छान आहे