“भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी..
सकाळी झोपेतून उठत असतानाच वरील गाण्याच्या ओळी कानावर पडल्या. नेहमीचा धांगडधिंगा आणि प्रेमगीत न लावता आज या आकाशवाणीला सैनिकांची कशी आठवण झाली कोणास ठाऊक? असे म्हणत मी डोळे किलेकिले करून कॅलेंडरकडे पाहिले. आज ‘२६ जानेवारी’ आहे देशाचा प्रजासत्ताकदिन ! हो, म्हणूनच देशभक्तींचे एवढे भरते आले आहे यांना. नाही तर रोज ते कानठळ्या बसणारे संगीत ऐकावे लागते.
आम्ही खया अर्थाने जगलो तो काळ होता स्वातंत्र्यापूर्वीचा. तो काळच असा होता, की जो तो देशासाठी आपला जीव ओवाळत होता. थोर नेत्यांच्या एका इशाऱ्यावर सर्व हालचाली होत असत. देशासाठी काही करून दाखविण्याची जिद्द प्रत्येकात होती. स्वातंत्र्य-संग्रामात सर्व देशवासियांनी उडी घेतलेली होती. आबाल-वृद्ध आपापल्या परिने देशसेवा करत होते. इंग्रजांना पळवून लावायचेच हा ध्यास सर्वांनी घेतलेला होता. अशा या भारावलेल्या अवस्थेमध्येच मी माझे शिक्षण घेत होतो. वय होते १८ वर्षांचे. म्यूर कॉलेजमध्ये शिकत असताना शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी १९३१ चा तो दिवस माझ्या जीवनात आला आणि माझे संपूर्ण जीवनच बदलून गेले. कॉलेज सुरु असतानाच जवळच असलेल्या आल्फ्रेड पार्क मध्ये सुरु असलेल्या गोळीबाराचा आवाज ऐकून आम्ही सर्व विद्यार्थी पार्कजवळ आलो. चंद्रशेखर आझाद आपल्या भारत भूमीसाठी शहीद झाल्याचे कळले आणि त्या प्रसंगाने माझ्या जीवनालाच कलाटणी मिळाली. देशासाठी आपणही काही करावे या निश्चयाने मी देखील स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. अनेक चळवळींमध्ये आणि मोर्त्यांमध्ये सहभागी झालो.
एका अशाच मोऱ्यांमध्ये घोषणा देत मी इतर सहकायांसोबत जात होतो. समोरून इंग्रज सैन्य आमच्यावर चाल करून आले. आमच्या मोर्ध्यावर त्यांनी लाठीमार सुरु केला. तरीही सर्वजण ‘वंदे मातरम”भारतमाता की जय’ अशा घोषणा देत पुढे सरकत होते. कोणीही माधार घेत नाही हे पाहून इंग्रज अधिकाऱ्याने गोळीबार करण्याचा आदेश दिला. गोळीबार सुरु होताच सर्वत्र गोंधळ पसरला. परंतु इंग्रजांसमोर मान न झुकविण्याचा सर्वांचा निर्धार होता. कित्येक स्वातंत्र्य सैनिक या गोळीबारात शहीद झाले. आमच्या समुहाचा नेता समोर येताच एका इंग्रज शिपायाने त्याच्यावर नेम धरला. मला थोडावेळ काही सुचलेच नाही. अचानकच कसलीशी उर्मी आली आणि मी त्याला माझ्यामागे घातले. बंदुकीमधून निघालेली गोळी माझ्या दंडाला लागून आरपार गेली आणि मी खाली कोसळलो. तुरुंगात डांबल्यावरही माझा व माझ्या साथीदाराचा छळ सुरूच होता. चाबकाचे फटके मारणे, तेलाच्या घाण्याला जुंपणे, दगड फोडणे अशा प्रकारे आमचा छळ होत होता. मरणप्राय यातना सोसूनही आम्ही इंग्रजांपुढे मान तुकविली नाही. अशा अनेक संकटांना तोंड देत आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काय दिवस होता तो! सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखा. आम्ही भोगलेल्या सर्व दुःखांचे आज सार्थक झाल्यासारखे वाटले.
पण-पण आज काय अवस्था झाली आहे, या देशाची? यासाठीच आम्ही आपला जीव धोक्यात घातला होता का? भ्रष्टाचार, बेकारी, हिंसा, गुंडगिरी, अपहरण, खुन-दरोडे. असे प्रकार इतके बोकाळले आहेत की, या देशाच्या भवितव्याची चिंता वाटते. ज्याच्या हाती सत्ता आहे,तोच देशाला लुबाडतो,खुर्चीसाठी दंगे घडवून आणतो. स्वार्था पोटी माणूस माणुसकी विसरला आहे, आणि नरराक्षस बनत चालला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली नितिमत्ता, नैतिकता लिलावात निघाली आहे. हे सर्व कधी थांबणार? काय होणार आहे या देशाचे? हे सर्व पाहण्यासाठी मी अजून जिवंत आहे का? देवा रे, नको मला हे असे जीवन! यापेक्षा आपण पारतंत्र्यात होतो, हे काय वाईट होते? ज्यांनी या देशासाठी जीव गमावला, त्यांना या गोष्टीचा निश्चितच त्रास होत असेल.